
लातूर, 31 मे (हिं.स.)।
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवारी लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी समाजबांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
कार्यक्रमास लातूरच्या महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके, अँड. अण्णाराव पाटील, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ, घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. समाजबांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis