तोडलेल्या वृक्षांची अंत्ययात्रा पालिका आयुक्तांच्या दारात
लातूर, 31 मे (हिं.स.)। गटारीच्या कामासाठी म्हणून अनावश्यक पद्धतीने झाडांची कत्तल केल्याचे निदर्शनास येताच आज आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने तोडलेल्या वृक्षांची अंत्ययात्रा काढत ते वृक्ष लातूर मनपाच्या आयूक्त मानसी मिना यांच्या शासकीय न
वृक्षतोड


लातूर, 31 मे (हिं.स.)।

गटारीच्या कामासाठी म्हणून अनावश्यक पद्धतीने झाडांची कत्तल केल्याचे निदर्शनास येताच आज आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने तोडलेल्या वृक्षांची अंत्ययात्रा काढत ते वृक्ष लातूर मनपाच्या आयूक्त मानसी मिना यांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

पाच नंबर चौक ते बार्शी रोड या मार्गावरील नाली बांधकामाचे काम सुरू असताना, आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनने पाच वर्षांपूर्वी लावलेली व जपलेली १० ते १५ फूट उंचीची ८ ते १० झाडे निर्दयीपणे तोडण्यात आली. ही झाडे केवळ वृक्ष नव्हती, तर अनेक कार्यकर्त्यांच्या मेहनतीची, प्रेमाची आणि पर्यावरणाप्रती असलेल्या समर्पणाची जिवंत ओळख होती. लहान रोपट्यांपासून लेकरांप्रमाणे संगोपन करून वाढवलेल्या या वृक्षांची झालेली कत्तल मनाला वेदना देणारी आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी तोडण्यात आलेल्या झाडांची अंत्ययात्रा काढून मा. आयुक्त मॅडम यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा नेला. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कारवाईची मागणी केली. विकासकामे आवश्यक असली तरी पर्यावरणाचा बळी देऊन होणारा विकास स्वीकारार्ह नाही. एका झाडाला वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात, मात्र ते तोडण्यासाठी काही मिनिटे पुरतात. ही घटना पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला चटका लावणारी असून, भविष्यात अशा प्रकारची वृक्षतोड टाळावी, अशी मागणी करण्यात आली.

फाऊंडेशनने वृक्षांची अंत्ययात्रा निवासस्थानाबाहेर आणल्याचे लक्षात येताच धावाधाव झाली. आता जेथून वृक्ष तोडले तिथे नव्याने झाडे लावण्याची हमी दिली असल्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande