
रायगड, 31 मे (हिं.स.)। खडी वाहतुकीसाठी आलेल्या पाच डंपरांना अडवून ठेवत दबाव टाकल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे क्राप्स इन्फ्रा, केशर खारपाडा-दुश्मी येथे फिर्यादी व त्यांचे सहकारी हे कार्तीक एंटरप्रायजेस कंपनीचे पाच डंपर घेऊन खडी भरण्यासाठी आले होते. त्यावेळी आर.डी. इन्फ्रा क्रेशरवर काम करणारे चार ते पाच कर्मचारी तसेच क्रेशरचे मालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने डंपर चालकांना अडविले.
आरोपींनी आर.डी. इन्फ्रा क्रेशरचे थकीत पैसे मिळेपर्यंत सर्व डंपर आमच्या क्रेशरवरच लावावे असा दबाव टाकत फिर्यादीच्या कंपनीचे पाचही डंपर अडवून ठेवले. संबंधित डंपरांना २९ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत रोखून धरल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १२६(२) व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)