
वॉशिंग्टन, 31 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत महत्त्वाच्या कराराच्या दिशेने सकारात्मक प्रगती होत असून दोन्ही देश एका चांगल्या कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. मात्र, वॉशिंग्टनच्या अपेक्षांनुसार निकाल लागला नाही तर अमेरिका हा प्रश्न दुसऱ्या मार्गाने सोडवेल, असा इशाराही त्यांनी दिला.ट्रम्प यांनी आपल्या सूनबाई लारा ट्रम्प यांना दिलेल्या मुलाखतीत ही टिप्पणी केली.
ट्रम्प म्हणाले, “आम्ही एका अतिशय चांगल्या कराराच्या जवळ आहोत. घाई केली तर चांगला करार होत नाही. हळूहळू पण निश्चितपणे आम्हाला जे हवे आहे ते मिळत आहे. आणि जर आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नाही, तर आम्ही हा प्रश्न दुसऱ्या मार्गाने सोडवू.” त्यांनी पुढे म्हटले की, इराणी प्रतिनिधी हे कुशल वाटाघाटीकार आहेत, मात्र सध्या सर्व बाजू अमेरिकेच्या हातात आहेत, कारण इराणला लष्करीदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. “आम्ही एका चांगल्या कराराच्या जवळ आहोत. तो झाला तर उत्तमच. अन्यथा आम्ही थेट युद्ध विभागाला पुढे आणू, ज्याला आम्ही त्या नावाने संबोधतो,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या मते, इराणने आपण अण्वस्त्र विकसित करत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, इराण भविष्यात अशी शस्त्रे विकत घेतल्यास काय होईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “आता करारात असे नमूद करण्यात आले आहे की आम्ही अण्वस्त्रे विकसित करणार नाही आणि कोणत्याही प्रकारे ती खरेदीही करणार नाही. या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक आहे.”
ट्रम्प यां दावा केला की, अमेरिकेचा इराणवर मोठा दबाव आहे, कारण त्यांची नौदल आणि हवाई दलाची क्षमता मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. मात्र, अमेरिकेने इराणची संपूर्ण लष्करी क्षमता नष्ट केली नाही, कारण तेथील काही नेते तुलनेने मवाळ भूमिका घेणारे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने इराणमधील कट्टरपंथी गट आणि महत्त्वाच्या नेतृत्वावर लक्ष केंद्रित केले. शुक्रवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील सिच्युएशन रूममध्ये आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, पुढील रणनीतीबाबत कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आला नाही.
दरम्यान, अमेरिकन माध्यम संस्थाच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये आधीच सहमती झालेल्या मसुदा करारात काही महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे की, ट्रम्प कराराला अंतिम स्वरूप देण्यास उत्सुक आहेत. मात्र, इराणच्या अणु सामग्रीशी संबंधित काही तरतुदी अधिक कठोर आणि प्रभावी करण्याची त्यांची इच्छा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode