
वॉशिंग्टन, 31 मे (हिं.स.)।इराणच्या नैऋत्य भागात गेल्या महिन्यात कोसळलेल्या अमेरिकन एफ-१५ लढाऊ विमानाबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. एका नव्या अहवालानुसार, या विमानाला चीननिर्मित खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आले असावे. तसेच संघर्षाच्या काळात चीनने इराणला अतिरिक्त लष्करी मदतही पुरवली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अहवालानुसार, या मदतीमध्ये स्टेल्थ विमान शोध तंत्रज्ञान आणि लांब पल्ल्याच्या रडार प्रणालींचा समावेश असू शकतो. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या प्रणालींच्या सहाय्याने इराणला एफ-१५ई स्ट्राइक ईगलसारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा मागोवा घेणे शक्य झाले असावे. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विमानाला खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राने पाडण्यात आल्याचे म्हटले होते. मॅनपॅड्स ही लहान, वाहून नेता येणारी क्षेपणास्त्र प्रणाली असते. ती खांद्यावरून डागली जाते आणि कमी उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानांना लक्ष्य करण्यासाठी वापरली जाते.
विमान कोसळल्यानंतर दोन्ही क्रू सदस्यांच्या शोधासाठी तब्बल ३६ तासांचे मोठे शोध आणि बचाव अभियान राबवण्यात आले. अपघातापूर्वी दोघांनीही इजेक्ट होऊन आपला जीव वाचवला होता. पेंटागॉनच्या माहितीनुसार, वैमानिकाची सुमारे सात तासांत सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र दुसरे अधिकारी, वेपन्स सिस्टिम्स ऑफिसर, यांची सुटका करण्यासाठी जवळपास दोन दिवस लागले. ते इराणमधील झाग्रोस पर्वतरांगांमध्ये लपून बसले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
एप्रिल महिन्यात हे लढाऊ विमान नेमके कसे कोसळले, याचा तपास अमेरिकन अधिकारी अजूनही करत आहेत. अहवालानुसार, जर हे सिद्ध झाले की विमान शत्रूच्या हल्ल्यामुळे पाडण्यात आले होते, तर अनेक दशकांतील ही पहिलीच अशी घटना ठरेल. अहवालात म्हटले आहे की, चीनने इराणला हे लष्करी साहित्य नेमके कधी पुरवले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, इराण खरोखरच चिनी शस्त्रास्त्रांचा वापर करत असल्याचे सिद्ध झाल्यास अमेरिका-चीन संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो.
अमेरिकेने यापूर्वीच चीनवर इराणला चिनी उपग्रह सेवांचा प्रवेश उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला आहे. वॉशिंग्टनच्या मते, त्यामुळे इराणला अमेरिकेच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ शकते. या आरोपांनंतर अमेरिकेने तीन चिनी उपग्रह कंपन्यांवर निर्बंधही लादले होते. मात्र चीनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याच महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी एका न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की चीन इराणला कोणतीही शस्त्रास्त्रे पुरवत नाही. ट्रम्प म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष शी यांनी मला वचन दिले आहे की चीन इराणला कोणतीही शस्त्रे पाठवत नाही. हे एक अत्यंत महत्त्वाचे आश्वासन आहे आणि मला त्यांच्या शब्दांवर विश्वास आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode