
अमरावती, 04 मे (हिं.स.)
उन्हाळी सुट्ट्यांमुळे एसटीने हंगामी भाडेवाढ केली असतानाच खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. विशेषत: अमरावती - पुणे ,इंदोर,शिर्डी आणि नाशिक या मार्गांवर तिकिटांचे दर भरमसाट वाढविण्यात आले असून, त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागत असून त्यांच्यात मोठी नाराजी आहे.
अमरावती पंचवटी चौकामधून दररोज शेकडो खासगी बस सुटतात आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची मागणी वाढल्याने बसची संख्या वाढविली जाते, त्याचवेळी तिकीट दरही वाढविले जातात.
सध्या एसी स्लीपरसाठी २५०० ते ३,५०० रुपये, तर सीटिंगसाठी २००० ते २५०० रुपये आकारले जात आहेत.गणपती, दसरा, दिवाळी, होळीचा सण तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र एसटी आणि रेल्वेची तिकिटे ऐनवेळी मिळत नसल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. याच संधीचा फायदा घेत दरवाढ केली जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी