
जळगाव, 04 मे (हिं.स.) जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली करत मासूमवाडी परिसरात बेकायदेशीररित्या गोवंश बाळगणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. वासिम असलम कुरेशी (वय ३१ वर्षे, रा. मासूमवाडी, जळगाव) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव असून या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जळगावचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मासूमवाडीतील डायमंड हॉल शेजारी मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल करून त्याचा साठा करण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
या छापेमारीत पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित आरोपी वासिम असलम कुरेशीला ताब्यात घेतले. घटनास्थळाची झडती घेतली असता त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे ६०० किलो गोमांस आणि १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे १४ जिवंत गोवंश (१३ गोऱ्हे व १ वासरू) जप्त करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व बीएनएस २०२३ च्या कलमांनुसार (गु. र. क्र. ३६३/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर