नाशिक : म्हाडा भूखंड घोटाळ्यात नायब तहसीलदाराला अटक
नाशिक, 04 मे (हिं.स.) : नाशिकमधील चर्चेत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत हात पोहोचवला आहे. या प्रकरणात नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन
नाशिक : म्हाडा भूखंड घोटाळ्यात नायब तहसीलदाराला अटक


नाशिक, 04 मे (हिं.स.) : नाशिकमधील चर्चेत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत हात पोहोचवला आहे. या प्रकरणात नाशिकचे नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी गंगापूर रोड येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. तपासात ४९ पैकी ३१ प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार नोंदी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. या घोटाळ्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती कार्यरत असून त्यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त यांचाही समावेश आहे. SIT च्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून पुढील तपासासाठी आणखी बैठका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, SIT कडून मिळणाऱ्या अहवालानंतर आणखी काही अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी भूमी अभिलेख विभागाने उघडकीस आणलेल्या या प्रकरणात आदिवासी, दलित आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राखीव असलेली घरे बिल्डरांकडून परस्पर विकली गेल्याचा गंभीर आरोप आहे.

या प्रकरणात सुरुवातीला सुमारे २५ बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काहींनी जामीन मिळवला असला तरी काहींवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. एका बिल्डरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले होते. आता पोलिस आणि SIT दोन्ही यंत्रणा सक्रिय झाल्याने नाशिकमधील या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande