
निलंगा मतदारसंघात पाणीटंचाई रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनाचा आढावा; प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना
लातूर, 04 मे (हिं.स.)।
उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून मे महिन्यातही तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा मतदारसंघात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसोबत पाणीस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. “मतदारसंघातील एकाही गावाला पाणीटंचाई भासू नये,” यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
निलंगेकर यांनी सांगितले की, यापूर्वी केलेल्या सिंचन व पाणीपुरवठा योजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे; मात्र वाढते तापमान लक्षात घेता प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील सध्याच्या पाणीसाठ्याची माहिती घेऊन संभाव्य टंचाई असलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच तलाठी आणि ग्रामसेवकांनी नियमित आढावा घेऊन पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचीही अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीच्या प्रारंभी तिन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांनी आपल्या भागातील पाणीसाठा व सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. या बैठकीस विविध लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis