
काँग्रेसला बहुमताच्या निम्म्याहून कमी जागा
गुवाहटी, 04 मे (हिं.स.) : आसाम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपली विजयाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. राज्यातील विधानसभेच्या 126 जागांपैकी बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता असते. या निवडणुकीत भाजपने संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत 97 जागा जिंकल्या असून 4 ठिकाणी निर्णायक आघाडी घेतली आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज ड्रामा दिसून आला. काँग्रेसकडून मुख्यमंत्री हिमंती बिस्वा सरमांच्या पत्नीवर झालेल्या खोट्या आरोपानंतर संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांचा आक्रामक प्रचार आणि विरोधकांवर सोडलेले टीकास्त्र देशभर गाजले. त्यामुळे आसामच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत होती. यामध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाल्याचे दिसून आले. संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडून हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसला राज्यात 15 जागांवर विजय मिळाला असून पक्षाने 7 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. राज्यात बहुमतासाठी 64 जागांची गरज असून भाजपने तो टप्पा ओलांडत 97 जागा पटकावल्या आहेत. तर 4 जागांवर भाजप उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी