
रायपूर, 04 मे (हिं.स.): छत्तीसगडच्या कवर्धा (कबीरधाम) जिल्ह्यात ३ आणि ४ मेच्या मध्यरात्री एक भीषण रस्ता अपघात घडला. पांडातराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंडई गावाजवळ फोक नदीत एक अनियंत्रित गाडी कोसळल्याने चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
पोलीसांच्या माहितीनुसार, सर्व युवक रायपूरच्या बिरगाव परिसरातील रहिवासी होते आणि पंडरिया येथे एका लग्न समारंभासाठी आले होते. लग्नाच्या विधी पूर्ण केल्यानंतर ते टाटा टियागो गाडी (सीजी १० एएस १०८२) ने रायपूरकडे परत जात होते. त्याच दरम्यान गंडई गावाजवळ फोक नदीच्या पुलावर त्यांची कार अतिवेगामुळे अनियंत्रित होऊन खाली कोसळली.पांडातराई पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी सांगितले की, अपघाताचे प्राथमिक कारण अतिवेग आहे. पुलाजवळ एक तीव्र वळण आहे, जिथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट नदीत कोसळली.अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण ६ जण प्रवास करत होते. मृतांची ओळख अरमान खान, सौंफ, अनस आणि कौनेन अशी झाली आहे. तर जुनैद रझा आणि आरजू खान हे गंभीर जखमी असून त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालय कवर्धा येथे नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि पोलीसांना कळवले. पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर पंडरिया आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule