संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती अनिवार्य – राजनाथ सिंह
नवी दिल्ली, 04 मे (हिं.स.) : तंत्रज्ञानातील वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर संशोधन आणि नवोन्मेष यांना सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित तीन दिवसीय नॉर्थ
DEFENCE MINISTER RAJNATH SINGH


DEFENCE MINISTER RAJNATH SINGH


नवी दिल्ली, 04 मे (हिं.स.) :

तंत्रज्ञानातील वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर संशोधन आणि नवोन्मेष यांना सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित तीन दिवसीय नॉर्थ टेक सिम्पोजियमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लष्कराच्या उत्तर व मध्य कमांड्स तसेच सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी आधुनिक युद्धपद्धती झपाट्याने बदलत असल्याचे नमूद करताना सांगितले की, ड्रोन, सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हायपरसोनिक तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा दाखला देत त्यांनी आधुनिक युद्धात तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, भविष्यात यश मिळवण्यासाठी “अनपेक्षित क्षमतेने शत्रूला आश्चर्यचकित करण्याची ताकद” आवश्यक आहे. इतिहासात अशा क्षमतेमुळे अनेकदा निर्णायक विजय मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण मंत्री यांनी सांगितले की, सरकारने संरक्षण संशोधन व विकास क्षेत्राला मोठे प्रोत्साहन दिले असून खासगी क्षेत्र, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात निधी राखून ठेवण्यात आला आहे. तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण धोरणामुळे उद्योगांना अधिक संधी उपलब्ध झाल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले की, देशांतर्गत संरक्षण उत्पादन 1.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून निर्यातही विक्रमी स्तरावर गेली आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सिम्पोजियममध्ये स्वदेशी तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संरक्षण उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. 284 कंपन्यांनी आपली तांत्रिक उत्पादने आणि नवकल्पना प्रदर्शनात मांडल्या आहेत.

कार्यक्रमात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande