फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा ट्रम्प यांच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’मध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार
पॅरिस , 04 मे (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी स्पष्ट केले आहे की, या मुद्द्यावर युरोप अमेरिकेपेक्षा वेगळी रणनीती अवलंबणार आहे.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा ट्रम्प यांच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’मध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार


पॅरिस , 04 मे (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी स्पष्ट केले आहे की, या मुद्द्यावर युरोप अमेरिकेपेक्षा वेगळी रणनीती अवलंबणार आहे. त्यांनी सांगितले की, युरोप स्वतःची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कोणत्याही अस्पष्ट लष्करी कारवाईचा भाग होणार नाही.

येरेवन येथे आयोजित युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटीच्या ८व्या बैठकीत मॅक्रों म्हणाले की, युरोपियन संघ आपली सुरक्षा आणि संरक्षणासाठी स्वतंत्र उपाययोजना करत आहे. “आम्ही आमचे भवितव्य स्वतःच्या हातात घेत आहोत आणि एक समान सुरक्षा चौकट विकसित करत आहोत,” असे त्यांनी नमूद केले. मॅक्रों यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’मध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला. होर्मुज सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, “ज्याची रचना स्पष्ट नाही अशा कोणत्याही उपक्रमात आम्ही सहभागी होणार नाही.” मात्र, फ्रान्सने जलमार्ग पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला असून, स्पष्ट आणि सर्वानुमते ठरवलेल्या चौकटीशिवाय कोणत्याही शक्ती-आधारित कारवाईत सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मॅक्रों यांनी सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा सर्वात टिकाऊ मार्ग म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात समन्वित करार होणे. त्यांनी मुक्त आणि टोलमुक्त नौवहन सुनिश्चित करण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे अधोरेखित केले.

दरम्यान, या भागातील परिस्थिती अद्याप अत्यंत संवेदनशील आहे. २८ फेब्रुवारीनंतर तणावात मोठी वाढ झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर तेहरानने प्रत्युत्तरादाखल इस्रायली ठिकाणे आणि आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकन सैन्य होर्मुज सामुद्रधुनीजवळ आले, तर त्यावर हल्ला केला जाईल.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, पाकिस्तानमार्फत मिळालेल्या अमेरिकेच्या प्रस्तावाचा आढावा घेतला जात आहे. सध्या प्राधान्य युद्ध थांबवण्यालाच दिले जात असून, अणु कार्यक्रमाशी संबंधित चर्चा केवळ तर्क-वितर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडीत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी प्रादेशिक परिस्थिती आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. इराणने पाकिस्तानच्या सकारात्मक आणि प्रामाणिक राजनैतिक प्रयत्नांचे कौतुकही केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande