
तेहरान , 04 मे (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये लष्करी तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना मुक्त करण्यासाठी लष्करी मोहिम जाहीर केली आहे. यानंतर सोमवारी इराण ने आक्रमक होत अमेरिका ला इशारा दिला की, जर त्यांनी होर्मुझ जलसंधी मध्ये प्रवेश केला, तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल.
इराणच्या मुख्य लष्करी कमांड खातम अल-अंबिया सेंट्रल मुख्यालय ने म्हटले आहे की, “कोणतेही परदेशी सशस्त्र दल, विशेषतः आक्रमक अमेरिकन सैन्य, होर्मुझ जलसंधीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर हल्ला केला जाईल.” इराणने असा दावा देखील केला आहे की या जलमार्गाची सुरक्षा पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात आहे आणि कोणत्याही जहाजाला सुरक्षित मार्ग हवा असल्यास इराणी सशस्त्र दलांशी समन्वय करणे आवश्यक आहे.
अमेरिकेने होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना मुक्त करण्यासाठी लष्करी मोहिम जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेला “प्रोजेक्ट फ्रीडम” असे नाव दिले आहे.ट्रम्प म्हणाले की, अनेक देशांनी अमेरिकेकडे मदत मागितली आहे, कारण त्यांच्या व्यापारी जहाजे या संघर्षात अडकली आहेत. “अनेक जहाजांवर अन्न आणि आवश्यक सामग्री संपत आहे. इराण, पश्चिम आशिया आणि अमेरिकेच्या हितासाठी आम्ही या जहाजांना सुरक्षित बाहेर काढू,” असे त्यांनी सांगितले. यामुळे इराण इतका आक्रमक झाला आहे.
यूएस सेंट्रल कमांड ने या लष्करी तैनातीची पुष्टी केली आहे. या मोहिमेत मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी सज्ज विध्वंसक जहाजे, 100 हून अधिक विमाने आणि सुमारे 15,000 सैनिकांचा समावेश आहे. पेंटागन च्या नेतृत्वाखाली ही मोहीम सोमवारी सकाळपासून सुरू झाली असून, व्यापारी जहाजांसाठी नौवहन स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करणे हा तिचा उद्देश आहे. अमेरिकेच्या या घोषणेनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. मागील काही दिवसांत पश्चिम आशियात तुलनेने शांतता होती, मात्र अमेरिकेच्या या घोषणेमुळे परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली आहे.
दरम्यान, पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला 14-सूत्रीय शांतता प्रस्ताव पाठवला आहे, जो अमेरिकेच्या 9-सूत्रीय प्रस्तावाच्या उत्तरादाखल तयार करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या प्रस्तावाबाबत शंका व्यक्त केली असली, तरी त्याचा आढावा घेण्यास ते तयार आहेत. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षानंतर 8 एप्रिलपासून लागू असलेल्या युद्धविरामामुळे राजनैतिक चर्चांना वाव मिळाला आहे.
11 एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे पाकिस्तानने दोन्ही देशांमधील पहिल्या टप्प्यातील थेट चर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळी कोणताही ठोस करार झाला नव्हता, परंतु परिस्थिती बिघडू नये म्हणून 21 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवला. इशाक डार आणि अब्बास अराघची यांच्यातील अलीकडील चर्चा ही त्याच प्रक्रियेचा भाग आहे. पाकिस्तानने स्पष्ट केले आहे की, केवळ संवाद आणि राजनैतिक मार्गानेच या प्रदेशात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode