राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले १ लाख १२ हजार ५८७ विक्रमी मतांनी विजयी
- ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त राहुरी (अहिल्यानगर), 04 मे (हिं.स.) - राहुरी विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले १ लाख १२ हजार ५८७ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. इतर सर्व ६ उमेदवारांच्या अनामत रक
अक्षय शिवाजी कर्डिले


- ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त

राहुरी (अहिल्यानगर), 04 मे (हिं.स.) - राहुरी विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले १ लाख १२ हजार ५८७ इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. इतर सर्व ६ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. विजय जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गुलाल उधळून जल्लोष केला. अक्षय कर्डिले यांची ही राजकीय कारकीर्द ठरवणारी पहिलीच निवडणूक आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवार अक्षय कर्डिले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यादव यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारले. मंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांचा सत्कार केला. तसेच निवडणूक योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल प्रशासनालाही धन्यवाद दिले.

भाजपचे अक्षय कर्डिले यांना एकूण १ लाख ४० हजार ९३ मते मिळाली, तर त्यांचे लगतचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली. एकूण ४१२ टपाली मतदान झाले. त्यातील २९ मते बाद झाली. कर्डिले यांना २८३ मते मिळाली.

जनतेने दिलेल्या संधीचा उपयोग प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू - अक्षय कर्डिले

राहुरी पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अक्षय कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला. या विजयानंतर बोलताना कर्डिले यांनी, ‘आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांना कधी विसरू शकत नाही. येत्या काळात सर्वांना मदत करणार, अशी भावना व्यक्त केली.

अक्षय कर्डिले म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतली होती. ही निवडणूक नव्हतीच तर प्रत्येक मतदाराने आपली स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रति असलेली भावना मतातून व्यक्त केलेली आहे. गेली ३० वर्षे कर्डिले यांनी प्रत्येक कुटुंबात, प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते, स्थान मिळवले होते. आज ते आपल्यासमवेत नाहीत. परंतु तेवढेच प्रेम, विश्वास जनतेने माझ्याबद्दल दाखवून मला संधी दिली आहे. आगामी काळात जनतेने दिलेली संधीचा उपयोग आपणही प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे अक्षय कर्डिले म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande