
पुणे, 04 मे (हिं.स.) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व विजय मिळवत देशाच्या राजकीय पटलावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड आघाडीसह त्यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणाऱ्या आमदाराचा मान पटकावला.
यापूर्वी सुनील कुमार शर्मा यांनी २०२२ साली उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून २ लाख १४ हजार ८३५ मतांच्या आघाडीसह विक्रम नोंदवला होता. हा विक्रम मोडीत काढत सुनेत्रा पवार यांनी बारामतीत नवा इतिहास रचला.
बारामती हा पारंपरिकदृष्ट्या पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यापूर्वी अजित पवार यांनी अनेक वेळा केले आहे. यंदाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर विक्रमी मताधिक्याने मतदारांचा प्रचंड विश्वासही संपादन केला.
या निवडणुकीत एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले. ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामती एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली आणि प्रत्येक फेरीत ती वाढवत नेली.
या निकालामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, बारामतीतील मतदारांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर ठाम विश्वास दाखवला आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु