
दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा
नंदुरबार, ६ मे (हिं.स.) : जिल्हा रुग्णालय नंदुरबारच्या रक्त केंद्रात प्रथमच अत्यंत दुर्मिळ असलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप चे यशस्वी निदान करण्यात आले असून संबंधित रुग्णासाठी आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. ही कामगिरी जिल्हा रुग्णालयासाठी उल्लेखनीय मानली जात आहे.
बॉम्बे ब्लड ग्रुप हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटांपैकी एक असून वैद्यकीय भाषेत त्याला ‘एचएच रक्तगट’ असे म्हटले जाते. या रक्तगटात ‘H Antigen’ हा महत्त्वाचा घटक पूर्णतः अनुपस्थित असल्याने तो A, B, AB आणि O या सामान्य रक्तगटांपेक्षा वेगळा ठरतो. भारतात साधारण दहा हजार व्यक्तींमागे एक व्यक्ती या रक्तगटाची आढळते, तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात त्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
या रक्तगटाच्या रुग्णांना केवळ त्याच रक्तगटाचे रक्त देता येते. चुकीने ‘O’ गटाचे रक्त दिल्यास गंभीर प्रतिक्रिया होऊ शकते, त्यामुळे अचूक निदान आणि योग्य रक्तपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतो.
सदर रुग्ण अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर येथील असून, या दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करणे ही मोठी आव्हानात्मक प्रक्रिया होती. मालेगाव येथील रक्तदाता साजिद अन्सारी तसेच अस्लम शेख अन्सारी आणि एजाज अहमद यांनी विशेष सहकार्य केले. तसेच विक्रम यादव, दीपक जैन आणि राकेश चौधरी यांनी रक्तदाता शोध मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
मालेगाव रक्त केंद्राचे संचालक कैलास सोनवणे व त्यांच्या टीमने रक्त संकलनासाठी सहकार्य केले. वाहनचालक विनय वळवी तसेच वैज्ञानिक अधिकारी जयेश सोनवणे आणि प्रीतम मेंथेवाड यांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून ‘बॉम्बे ब्लड’ नंदुरबार येथे पोहोचवले. त्यानंतर सकाळी आवश्यक ‘क्रॉस मॅच’ व इतर तपासण्या पूर्ण करून रुग्णाला रक्त देण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर आणि वैज्ञानिक अधिकारी प्रीतम मेंथेवाड यांनी या निदानात महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, २०२५ साली नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सहा हजारांहून अधिक रक्तसंकलन करून विक्रम प्रस्थापित झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या कार्याचे कौतुक करत नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर