कोल्हापूर-सांगलीत यंदा महापूराची शक्यता कमी : पंजाबराव डख
कोल्हापूर, ६ मे (हिं.स.) : यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. हातकणंगले तालुक्यातील टोप येथे आयोजित शेतकरी मे
पंजाबराव डख यांना शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार प्रदान


कोल्हापूर, ६ मे (हिं.स.) : यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. हातकणंगले तालुक्यातील टोप येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात पंजाबराव डख यांना टोप येथील शिवप्रेमी ग्रुपतर्फे “शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी केवळ चालू वर्षाचाच नव्हे, तर पुढील २५ वर्षांच्या पावसाच्या चक्राविषयीही अंदाज व्यक्त करत शेतकऱ्यांनी निसर्गातील बदलांचे बारकाईने निरीक्षण करावे, असे आवाहन केले. निसर्गातील संकेतांमधून भविष्यातील हवामानाचा अंदाज बांधता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात अरुण दुधवडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रकाश पाटील, नामदेव गिरी, पुंडलिक जाधव, अनिल खवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अरुण दुधवडकर यांनी गेली २५ वर्षे समाजातील उल्लेखनीय व्यक्तींना सन्मानित करणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तर पुंडलिक जाधव यांनी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमात इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande