विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही : मुख्यमंत्री
क्षमता आणि सुविधांद्वारे औद्योगिक विकासाचा व्यक्त केला विश्वास नाशिक, 06 मे (हिं.स.) - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाह
Nashik will not stop now


क्षमता आणि सुविधांद्वारे औद्योगिक विकासाचा व्यक्त केला विश्वास

नाशिक, 06 मे (हिं.स.) - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. क्षमता आणि सुविधाद्वारे येथील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हॉटेल ताज येथे आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषद २०२६ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आहेर- आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ३०० हून अधिक उद्योजकाच्या सोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून ३२ हजार इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.

विकासाची मोठी संधी असलेले नाशिक हे शहर असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात गुंतवणूक व्हावी यासाठीचा कुंभ उद्योग संगम उपक्रम अतिशय चांगला आहे. या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून नाशिक विकासाच्या मुख्य धारेत पुन्हा आला आहे. मागील तीन वर्षापासून आपण जिल्हा केंद्रित गुंतवणूक परिषद घेण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत एकूण ३१ हजार ९४५ कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात झाली आहे. त्यातून ६६ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामंजस्य करारापैकी ७७ टक्के कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स, कृषीधरीत सेवा, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, सेवा क्षेत्रासह इतर उद्योगातील गुंतवणुकीचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातही अनेक उद्योग समूहानी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करत आहे, जागा उपलब्ध झाल्यास या उद्योगाची त्वरीत सुरूवात करण्यात येईल. याशिवाय, रिलायन्स, कारण अँड टुब्रो यासारख्या उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. अनेक उद्योगसमूह येथे उद्योगविस्तारासाठी इच्छुक असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिकसाठी आली असून दावोस येथे झालेल्या परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी १२ हजार कोटींची गुंतवणूक राज्य शासनाने आणल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री .फडणवीस म्हणाले, राज्यात आता उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक हे नवे मॅग्नेट तयार झाले आहे. त्यामुळे नाशिकचा विकास आता थांबणार नाही. अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार हेही उद्योगासाठी गुंतवणुकीचे ग्रोथ इंजिन होत आहेत. याशिवाय, मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर, जालना येथे मोठे उद्योग येत आहेत. विदर्भात नवीन मॅग्नेट तयार झालेत. विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची आहे. त्यामध्ये भौगोलिक समतोल असावा, यादृष्टीने काम सुरू आहे. सुरुवातीला केवळ मुंबई, पुणे आणि महानगर प्रदेश केंद्रित विकास असे धोरण होते. राज्य शासनाने जिल्ह्याला विकासाचे केंद्र केले पाहिजे, अशी भूमिका घेतली. जिल्ह्याच्या क्षमतांचा आणि सुविधांचा उपयोग केला पाहिजे. त्यादृष्टीने केवळ मोठे उद्योगांसोबत लघु उद्योगांना प्राधान्य देण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले, उद्योजकांना गुंतवणूक करताना आणि उद्योग सुरू करताना सुलभ व्हावे यासाठी आपण उद्योगस्नेही धोरण आखले. विविध परवानग्या एक छताखाली आणल्या. त्यासाठी मैत्री सारखी सुविधा निर्माण करण्यात आली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. मैत्रीद्वारे ३ लाखाहून अधिक अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर उद्योग सुरू होत आहेत. महाराष्ट्र ही आता स्टार्ट अप्सची राजधानी झाले आहे. राज्यात ३० हजाराहून अधिक स्टार्ट अप्सची सुरुवात झाली आहे. शेती क्षेत्रात स्टार्ट अप्सने क्रांती केली आहे याशिवाय, एक जिल्हा एक उत्पादन मधे मूल्यवर्धन करून राज्य शासन त्या माध्यमातून ब्रॅण्डिंग करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

कुंभमेळासाठी राज्य शासन ३३ हजार कोटींची गुंतवणूक करत आहे. ही गुंतवणूक पुढील १५-२० वर्ष उद्योगासाठी मॅग्नेटच काम करेल, असा विश्वास व्यक्त करून श्री.फडणवीस म्हणाले, यामुळे निर्माण झालेल्या दळणवळण सुविधा, ड्राय पोर्ट, पायाभूत सुवधा, रिंगरोड आदी सुविधांमुळे पुढील १० वर्षात ३ लाख कोटींची अर्थव्यवस्था नाशिक जिल्ह्यात तयार होईल. कुंभमेळा विकासाच्यादृष्टीने परिवर्तन करणारा ठरेल. गुंतवणूकच्या संधी आहेत. याशिवाय गोदावरी शुद्धीकरण, पर्यावरण रक्षण , जल शुद्धीकरण याकडे लक्ष आहे. कुंभ अधिक सुगम कसा होईल याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

हा सिंहस्थ कुंभमेळा डिजिटल कुंभ करायचा आहे. त्याची चांगली तयारी सुरू आहे. कमी काळात सगळी कामे अधिक गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. भेदभाव विरहित भारतीय संस्कृतीच्या आस्थेचा सर्वात मोठा अविष्कार आणि अर्थव्यवस्थेला गती देणारा समता आणि श्रद्धेचा मेळा म्हणजे कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक उपयोग असणारा हा कुंभ असेल. प्रत्येकाला अध्यात्मची आनंददायी अनुभूती मिळावी यासाठी सर्व सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande