जिद्द आणि चिकाटीचे फळ : शेंद्री (सुनेगाव) चे सुपुत्र संतोष काटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
लातूर, 06 मे (हिं.स.) - ‘कष्टाशिवाय फळ नाही आणि जिद्दीशिवाय यश नाही’ याचाच प्रत्यय पुन्हा एकदा अहमदपूर तालुक्यातील शेंद्री (सुनेगाव) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने दिला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले संतोष प्रल्हाद काटे यांनी महा
संतोष काटे


लातूर, 06 मे (हिं.स.) - ‘कष्टाशिवाय फळ नाही आणि जिद्दीशिवाय यश नाही’ याचाच प्रत्यय पुन्हा एकदा अहमदपूर तालुक्यातील शेंद्री (सुनेगाव) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने दिला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले संतोष प्रल्हाद काटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विभागीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) पदाला गवसणी घातली आहे.

अहमदपूर तालुक्यातील शेंद्री(सुनेगाव) येथील संतोष काटे हे २०१२ पासून मुंबई पोलीस दलात सेवा बजावत आहेत. पोलीस दलातील कामाचा ताण, कर्तव्याची जबाबदारी आणि वेळेचा अभाव असूनही त्यांनी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते. जाहिरात क्रमांक ४७/२०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत विभागीय स्पर्धा परीक्षेत त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

ग्रामीण भागातील तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान

शेंद्री (सुनेगाव) येथील शेतकरी प्रल्हाद काटे यांचे सुपुत्र असलेल्या संतोष यांनी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत हे पद मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ शेंद्री गावासह संपूर्ण अहमदपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांनी जर मनात जिद्द ठेवली, तर ते कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतात, हेच संतोष यांनी दाखवून दिले आहे.

संतोष काटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल शेंद्री (सुनेगाव) येथील ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande