
परभणी, 06 मे (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी राजकीय खळबळ उडाली असून जिल्हाप्रमुख पदातील अचानक बदलानंतर तब्बल ८२ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची घटना समोर आली आहे. या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे.
पक्षाने आयोजित केलेल्या जिल्हा आढावा बैठकीस विद्यमान जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी गंगाखेड तालुक्यातील विष्णू मुरकुटे यांची नवीन जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे आनेराव समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
या पार्श्वभूमीवर अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले. पक्षप्रमुख यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात, गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटविण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले असून त्यांच्यावरील कारवाईमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचेही पत्रात म्हटले आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते, महिला जिल्हा संघटक मंगल कथले, दलित आघाडीचे संजय सारणीकर, उपजिल्हाप्रमुख रंजीत गजमल, दशरथ भोसले, मनोज काकणे यांच्यासह अनेक तालुका व विभागीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांनीही आपले पद सोडले आहे.
या सर्व घडामोडींमुळे येत्या काळात परभणीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आणखी मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis