

नवी दिल्ली, ७ मे (हिं.स.) : अरविंद भालचंद्र मार्डीकर यांची पुन्हा एकदा हिंदुस्थान समाचार बहुभाषिक वृत्तसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हिंदुस्थान समाचार सहकारी समितीची (लिमिटेड) बुधवारी नवी दिल्ली येथे बैठक झाली. या विशेष वार्षिक बैठकीत ते सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आले. याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार पद्मविभूषण राम बहादुर राय, प्रसिद्ध समाजसेवी रविंद्र मणिलाल संघवी यांची देखील पुन्हा एकदा संचालक मंडळाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या उमंग सभागृहात हिंदुस्थान समाचारची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा ही या वर्षीची निवडणूक बैठक देखील होती. यामध्ये नवीन संचालक मंडळाची स्थापना तसेच अध्यक्षांची निवड यांचा समावेश होता. पुढील तीन वर्षांसाठी नागपूरचे रहिवासी अरविंद भालचंद्र मार्डीकर पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. याआधी 2023 मध्ये ते प्रथमच अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आले होते. पद्मविभूषण राम बहादुर राय आणि रविंद्र मणिलाल संघवी (मुंबई) यांची पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी संचालक मंडळाचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार अशोक टंडन हे संचालक मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य असतील. तसेच, परेशकांत प्रेम मनोहर मांगलिक (मुंबई) आणि मंगल प्रताप पांडे (रांची), जे पूर्वी विशेष निमंत्रित होते, त्यांची संचालक मंडळाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. इंदूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक कमल कांत वशिष्ठ यांची संचालक मंडळाचे नवे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. वकील आणि निवडणूक अधिकारी अजित कुमार यांनी नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
अरविंद मार्डीकर यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या मागील कार्यकाळासह आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करताना ज्येष्ठ पत्रकार राम बहादुर राय म्हणाले की, त्यांनी प्रत्येक आव्हानाला तोंड देताना हिंदुस्थान समाचारला सर्वोच्च स्थान दिले. रविंद्र संघवी म्हणाले की, हिंदुस्थान समाचारचे भविष्य अखंड उर्जा असलेल्या आपल्या अध्यक्षांच्या हातात सुरक्षित आहे आणि सतत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. अरविंद मार्डीकर यांची त्यांच्या कार्यकाळातील आर्थिक स्थिती, विविध कार्यक्रमांद्वारे संस्थेचा विस्तार, तसेच संस्थेची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल संचालक मंडळाच्या सदस्यांनी त्यांची खूप प्रशंसा केली. संस्थेमध्ये काम करणाऱ्या आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मेहनत आणि समर्पणाचे श्रेय म्हणून अरविंद मार्डीकर यांनी आभार मानले.
उल्लेखनीय म्हणजे, 2016 मध्ये अरविंद मार्डीकर संचालक मंडळाचे सदस्य म्हणून रुजू झाले, तेव्हा प्रसिद्ध उद्योगपती आणि एसआयएसचे संस्थापक आर.के. सिन्हा हिंदुस्थान समाचारचे व्यवस्थापन सोपवण्यात आले होते. मे 2018 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. 2020 मध्ये कोविड महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आर.के. सिन्हा यांनी एप्रिल 2022 मध्ये राजीनामा दिल्यानंतर उर्वरित एका वर्षाच्या कार्यकाळासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मे 2023 मध्ये ते पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी