
नवी दिल्ली , 07 मे (हिं.स.)।ऑरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारताच्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला नाही, जसा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर झाला होता, असा आरोप पक्षाने केला. उलट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख आसीम मुनीर यांचे उबदार स्वागत केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, ऑपरेशन सिंदूर थांबवणाऱ्या युद्धविरामाची पहिली घोषणा 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5:37 वाजता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केली होती. त्यांनी दावा केला होता की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हे शक्य झाले. जयराम रमेश यांनी आरोप केला की ट्रम्प यांनी नंतरही अनेकदा हा दावा पुन्हा केला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कधीही खंडन केले नाही.
काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, 30 मे 2025 रोजी सिंगापूरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी मान्य केले होते की सुरुवातीच्या टप्प्यातील सामरिक चुकांमुळे भारताला नुकसान सहन करावे लागले. मात्र त्यानंतर रणनीतीत सुधारणा करून भारतीय सैन्याने पाकिस्तानातील लक्ष्यांवर अचूक हल्ले केले.
जयराम रमेश यांनी पुढे म्हटले की, 10 जून 2025 रोजी जकार्ता येथे भारतीय दूतावासातील संरक्षण अधिकाऱ्यांनी मान्य केले होते की 7 मे 2025 रोजी राजकीय नेतृत्वाने घातलेल्या निर्बंधांमुळे भारताला काही लढाऊ विमाने गमवावी लागली. त्यांनी दावा केला की, 4 जुलै 2025 रोजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी सांगितले होते की ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला चीनकडून मोठी मदत मिळाली. यात शस्त्रे आणि दारुगोळ्यासोबतच सॅटेलाइट प्रतिमा आणि रिअल-टाइम टार्गेटिंग सपोर्टचाही समावेश होता.
काँग्रेसने आरोप केला की, या सर्व घटनांनंतरही मोदी सरकारचा चीनबाबतचा मवाळ दृष्टिकोन कायम आहे. पक्षाने लडाखमधील पारंपरिक गस्त अधिकारांचे नुकसान, चीनकडून विक्रमी आयात आणि एफडीआय नियमांमधील शिथिलतेचाही उल्लेख केला.
जयराम रमेश यांनी सांगितले की, 1999 च्या कारगिल युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने के. सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली कारगिल पुनरावलोकन समिती स्थापन केली होती. या समितीने संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करून भविष्यासाठी शिफारसी केल्या होत्या. काँग्रेसने सूचित केले की, ऑपरेशन सिंदूरसंदर्भातही अशाच प्रकारच्या पुनरावलोकनाची गरज आहे.
दरम्यान, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुसंख्य पर्यटक होते. त्यानंतर भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. मात्र 10 मे रोजी लष्करी अधिकाऱ्यांमधील हॉटलाइन चर्चेनंतर सैनिकी कारवाई थांबवण्यावर सहमती झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode