अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज; सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर
श्रीनगर , 07 मे (हिं.स.)।श्री अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार आहे.यामुळे यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. यात्रा मार्गावरील बर्फ हटवणे आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून ती वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच प्रवाशांसा
अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज; सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर


श्रीनगर , 07 मे (हिं.स.)।श्री अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार आहे.यामुळे यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. यात्रा मार्गावरील बर्फ हटवणे आणि दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून ती वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच प्रवाशांसाठी नोंदणी प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था आणि आरोग्य सुविधा यांनाही अंतिम स्वरूप दिले जात आहे.

गांदरबलचे जिल्हा उपायुक्त जतिन किशोर यांनी बुधवारी बैठक घेऊन बालटाल मार्गावरील यात्रा व्यवस्थेचा आढावा घेतला. बैठकीत पोलिस विभागासोबत सुरक्षा व्यवस्थेची सविस्तर समीक्षा करण्यात आली. तैनातीची ठिकाणे, तपासणी नाके आणि झडती केंद्रांना अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बेस कॅम्पच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर सुरक्षा स्कॅनर बसवण्याचे निर्देश देण्यात आले.

सीमा रस्ते संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बर्फ हटवण्याचे काम वेगाने सुरू असून नियोजित वेळेत मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधा विकासासाठी बहुतांश कामांच्या निविदा जारी करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी कामालाही सुरुवात झाली आहे.

कामगार विभागाने माहिती दिली की, पोनी आणि पिट्ठू चालकांची नोंदणी सुरू झाली असून येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया अधिक वेगाने राबवली जाणार आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आरएफआयडी आणि ई-केवायसी काउंटरची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑन-द-स्पॉट नोंदणी केंद्रांवर अतिरिक्त काउंटरही उभारले जाणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत संबंधित विभागांना यात्रा मार्गावर पुरेशा शौचालयांची व्यवस्था आणि योग्य कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालटाल आणि इतर ठिकाणी वैद्यकीय सुविधा आवश्यक उपकरणे आणि कर्मचाऱ्यांसह अधिक सक्षम केल्या जात आहेत.

13 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही यात्रा करू शकते. मात्र सहा आठवड्यांपेक्षा अधिक गर्भावस्था असलेल्या महिलांना यात्रेत सहभागी होता येणार नाही. हिंदू भाविकांसाठी ही यात्रा अत्यंत श्रद्धेची मानली जाते, पण साहसी पर्यटनाची आवड असलेल्या लोकांसाठीही अमरनाथ यात्रा एक वेगळा अनुभव ठरते.ऑनलाइन नोंदणीसाठी श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (एसएएसबी)च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ऑफलाइन नोंदणी देशभरातील 556 निश्चित बँक शाखांमध्ये केली जाऊ शकते. यात येस बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करताना काही बाबी अनिवार्य आहेत. त्यामध्ये 150 रुपयांचे परमिट शुल्क, वैध ओळखपत्र (आधार कार्ड) आणि यात्रेसाठी आवश्यक असलेले आरोग्य प्रमाणपत्र (सीएचसी) यांचा समावेश आहे. हे आरोग्य प्रमाणपत्र 8 एप्रिल 2026 किंवा त्यानंतर जारी झालेले असणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंना एसएएसबी पोर्टलवरील स्वतंत्र लिंकद्वारे अर्ज करावा लागेल. यासाठी वैध पासपोर्ट, आवश्यक आरोग्य प्रमाणपत्र (सीएचसी), अलीकडील फोटो आणि सुमारे 1,550 रुपयांचे शुल्क आवश्यक असेल. परमिट शुल्क अधिकृत बँकेमार्फत (प्राधान्याने सरकारी बँक) पंजाब नॅशनल बँकेच्या जम्मू येथील निश्चित कार्यालयात जमा करता येईल. यासंदर्भातील संपूर्ण माहिती एसएएसबीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी पंजाब नॅशनल बँक, सर्कल ऑफिस, जम्मू येथील वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी विभाग यांना atmjk@pnb.co.in या ई-मेलवर पाठवाव्या लागतील. मंजुरीनंतर परमिट जम्मू किंवा श्रीनगरमधील पंजाब नॅशनल बँकेच्या निश्चित शाखेतून घेता येईल किंवा ई-मेलद्वारेही मिळवता येईल.

नोंदणी प्रक्रिया 26 जून 2026 या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी बंद होणार आहे. मात्र पसंतीचा स्लॉट आणि मार्ग निश्चित करण्यासाठी लवकर अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी यात्रेकरूंना आरएफआयडी कार्ड घेणे बंधनकारक असेल. हे एक ट्रॅकिंग डिव्हाइस असून प्रवेशासाठी आवश्यक मानले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande