ऑपरेशन सिंदूरची वर्षपूर्ती : भारतीय सैन्याने दिला कारवाईचा तपशील
जयपूर, 07 मे (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांकडून 26 हिंदूंचे टार्गेट किलींग झाल्यानंतर भारतीय सैन्याने 7 ते 9 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या कारवाईला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिन्ही सेना दला
लेफ्टनंट जनरल राजीव घई


जयपूर, 07 मे (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांकडून 26 हिंदूंचे टार्गेट किलींग झाल्यानंतर भारतीय सैन्याने 7 ते 9 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या कारवाईला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिन्ही सेना दलांच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राजस्थानच्या जयपूर येथे संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या वर्षीच्या कारवाईचा सविस्तर तपशील दिला.

भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जयपूर येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात महत्त्वाचे खुलासे केले. हवाई दलाचे एअर मार्शल अवधेश कुमार भारती, लष्कराचे लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि नौदलाचे व्हाइस ऍडमिरल ए.एन. प्रमोद यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई सुरू करण्यात आली होती. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांनी संयुक्तपणे पाकिस्तान तसेच पाकिस्तान-व्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून ही मोहीम राबवली.

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर ही समाप्ती नाही, तर केवळ सुरुवात आहे. भारत दहशतवादाविरुद्ध आपला लढा पूर्ण जबाबदारीने आणि ठामपणे सुरू ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर एअर मार्शल अवधेश कुमार भारती म्हणाले की, भारताने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ऑपरेशनचा मुख्य उद्देश केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करणे होता. भविष्यात कोणत्याही दहशतवादी कारवाईला भारताकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी दावा केला की 7 मे रोजी भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पाकिस्तानच्या काही लष्करी ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले.

एअर मार्शल भारती यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील 11 हवाई तळांवर कारवाई करण्यात आली आणि सुमारे 13 विमाने नष्ट झाली. तसेच 300 किलोमीटरहून अधिक अंतरावरून एक उच्च-मूल्य हवाई लक्ष्य पाडण्यात आले, असा दावाही त्यांनी केला. लेफ्टनंट जनरल घई यांनी नियंत्रण रेषेवरील प्रत्युत्तरात्मक कारवाईत 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने काही सैनिकांना मरणोत्तर सन्मान दिल्याने या नुकसानीचा अंदाज येतो.

तसेच व्हाइस ऍडमिरल ए.एन. प्रमोद यांनी सांगितले की, नौदलाच्या तैनातीमुळे पाकिस्तानच्या नौदल व हवाई दलाच्या हालचाली मर्यादित झाल्या. भारताने अचूक आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करून कारवाई केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने आपली लष्करी उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर ही कारवाई थांबवली. मात्र, देशाची सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धची लढाई पुढेही अधिक मजबूतपणे सुरू राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande