
पुणे, 07 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळातर्फे यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल आठ दिवस लवकर जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९४.१० टक्के लागला होता.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
निकाल येथे पाहता येणार
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6. mahresult.nic.in
7. sscresult.mkcl.org (१० वी साठी)
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु