संघाची शताब्दी आणि डाव्यांची शंभरी !
नागपूर, 07 मे (हिं.स.) : भारतात , सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण याच काळात परस्परविरोधी विचारधारा असलेली कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या दोन्ही संस्थांनी शंभर वर्षांचा प
प्रतिकात्मक लोगो


नागपूर, 07 मे (हिं.स.) : भारतात , सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण याच काळात परस्परविरोधी विचारधारा असलेली कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या दोन्ही संस्थांनी शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण करून 101 व्या वर्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विनोद देशमुख यांनी दोन्ही संघटनांच्या वैचारिक आणि राजकीय वाटचालीवर सविस्तर विश्लेषण मांडले आहे.

स्थापनेपासूनच प्रंचड विरोधाचा सामना करणारा संघ आजघडीला सर्वसमावेशक बनला आहे. परिणामी बंगालमध्ये प्रथमच भाजपाचे राज्य येऊ शकले. तर, हिंदू विरोधाची शिदोरी घेऊन शतकी वाटचाल करणाऱ्या डाव्यांना मात्र केरळम् मधील पराभवामुळे राजकीय अधोगतीचा अंतिम प्रवास अनुभवावा लागत आहे.

भारतातील डाव्यांचा प्रवास

संघ आणि डावे दोघांचाही 50 वर्षांपासून जवळून अभ्यास असणारे विनोद देशमुख यांनी

भारतातील समाम्यवादी (डाव्या) विचारधारेच्या प्रवासाबद्दल सांगितले की, संघ आणि सीपीआय दोन्हींची वैचारिक मुहूर्तमेढ तशी 1920 मधील आहे. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या रशियन राज्यक्रांतीपासून प्रेरणा घेऊन 1920 मध्ये एम.एन. रॉय यांनी रशियाच्या ताश्कंद येथे भारतीय कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रारंभ केला. त्यानंतर उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एस.व्ही. घाटे, श्रीपाद अमृत डांगे, मुजफ्फर अहमद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 26 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पार्टीची (सीपीआय) स्थापना केली. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्टांचे सरकार सर्वप्रथम 1957 साली केरळम् मध्ये नम्बुद्रीपाद यांनी स्थापन केले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 अशी सलग 34 वर्षे माकपच्या नेतृत्वाखाली डाव्यांचे सरकार होते. त्रिपुरामध्ये कम्युनिस्टांनी 1978 ते 1988 आणि 1993 ते 2018 असे तेवढाच काळ शासन केले. म्हणजे खंडप्राय भारतात गेल्या 100 वर्षात डाव्या विचारधारेला 3 राज्यांच्या पलिकडे जाता आले नाही; किंबहुना ते जाऊ शकले नाहीत, असे देशमुख यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे शासन तृणमूल काँग्रेसने ध्वस्त केले. तर त्रिपुरात भाजपाने डाव्यांना पराभूत केले आणि आता केरळमध्ये पिनराई विजयन सरकारच्या पराभवामुळे डाव्यांचा शेवटचा गढ ढासळला आहे. एकूणच पक्षस्थापनेची शताब्दीपूर्ती होत असतानाच राजकीय सत्ता आणि जनसमर्थन या दोन्ही स्तरांवर डाव्यांचा प्रवास उतरंडीचा ठरल्याचे देशमुख यांनी लक्षात आणून दिले.

संघाची चढती भाजणी

कम्यनिस्ट पक्षाप्रमाणेच संघाचे अप्रत्यक्ष बीजारोपणही 1920 सालचेच आहे. नागपुरातील काँग्रेस अधिवेशनात तत्कालीन काँग्रेस नेते डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी गणवेशधारी व्हॉलेंटिअर्सचा प्रयोग केला होता. त्यानंतर त्यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरातील आपल्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली. संघ आणि कम्युनिस्टांमधील मूलभूत फरक अधोरेखित करताना देशमुख म्हणाले की, संघ पूर्णपणे समाजकारण आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची जपणूक करणारे संघटन आहे. याउलट, कम्युनिस्टांची वैचारिक सरिता राजकीय सत्तेच्या महासागरातच विलीन होत असते ! त्यामुळेच असेल कदाचित, संघ दिवसागणिक वर्धिष्णू होत जागतिक स्तरावर पोहोचला आणि कम्युनिस्ट रसातळाला गेल्यात जमा आहेत.

स्थापनेपासून 3 वेळा प्रतिबंध आणि कमालीचा राजकीय विरोध सहन करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेदातील चरैवेती चरैवेती सिद्धांतावर विश्वास ठेवून निरपेक्षपणे आपले काम करीत राहिला. गांधी हत्येशी बादरायण संबंध जोडून संघाला बदनाम करण्याचे प्रयत्न अजूनही होताना दिसतात. या प्रतिकूल परिस्थितीतही संघाने राष्ट्रनिष्ठा सोडली नाही. उलट, आणिबाणीच्या संकटात कारावास भोगून लोकशाही वाचवण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्रीराम जन्मभूमीच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात संघाने आपला संपर्क वाढवला आणि जनसेवेच्या माध्यमातून लोकांना आपलेसे केले, हे सांगताना देशमुख म्हणाले की, संघाच्या या कार्याचा लाभ संघ परिवारातील भाजपाला आपोआपच झाला. त्यामुळेच केंद्रात भाजपाचे सरकार गेली 12 वर्षे आहे आणि देशभरातील 28 पैकी 21 राज्यांमध्येही सत्ता आहे. हा संघविचाराच्या प्रसाराचाच परिणाम होय.

यशापयशाची कारणे

संघाचे यश आणि कम्युनिस्टांचे अपयश यावर प्रकाश टाकताना देशमुख म्हणाले की, संघ स्थापनेच्या वेळीच डॉ. हेडगेवारांनी भगव्या ध्वजाला गुरू मानून संघाला व्यक्तिपूजेपासून दूर ठेवले. तसेच सर्व जातींच्या माणसांना जोडून समग्र हिंदूंचे संघटन बांधण्याचा संकल्प केला. त्यामुळे संघाच्या विरोधातील अपप्रचार नाकारत लोक संघाकडे आकर्षित होत गेले. म्हणूनच शताब्दी वर्षात संघाचा अश्वत्थ वृक्ष डौलदारपणे उभा आहे. याउलट, कार्ल मार्क्स, लेनिन, स्टॅलिन आणि माओ त्से-तुंग यांच्या परदेशी विचारांवर आधारित कम्युनिस्ट चळवळ सामाजिक, राजकीय अधोगतीला लागली आहे आणि याच डाव्या विचारातून जन्माला आलेली नक्षली पिलावळ देखीलशंभरी मोजत आहे !-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande