
मुंबई, 07 मे, (हिं.स.) टी२० मुंबई लीगचा चौथा हंगाम आणि टी२० मुंबई महिला लीगचा पहिला हंगाम १ ते १३ जून दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली. पुरुष आणि महिला स्पर्धा एकाच वेळी आयोजित केल्या जातील.
एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, टी२० मुंबई लीगने मुंबईची क्रिकेट संस्कृती मजबूत करण्यात आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना खेळातील काही मोठ्या नावांसोबत खेळण्याची संधी देण्यात सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा वानखेडे स्टेडियमवर आयोजित करणे हे प्रतिभा विकसित करण्याच्या आणि मुंबई क्रिकेटला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या एमसीएच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.
लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता म्हणाले, वानखेडे स्टेडियमवर खेळण्याची संधी अनेक तरुण क्रिकेटपटूंसाठी एक मोठा क्षण असेल आणि क्रिकेटपटू म्हणून त्यांच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण आणि जिओहॉटस्टारवर स्ट्रीमिंगमुळे, क्रिकेटपटूंना देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची मौल्यवान संधी मिळेल. संपूर्ण स्पर्धेदरम्यान चाहत्यांना रोमांचक आणि उच्च दर्जाच्या क्रिकेटची अपेक्षा करता येईल.
पुरुषांच्या स्पर्धेत क्रिकेटमधील जगातील काही मोठी नावे आणि शहरातील सर्वात आश्वासक उदयोन्मुख क्रिकेटपटू सहभागी होतील. या क्रिकेटपटूंमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे आणि अभिज्ञान कुंडू यांचा समावेश आहे.
पहिल्या महिला लीगमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील काही सर्वात आश्वासक युवा क्रिकेटपटूंसोबतच सायली सातघरे, सायमा ठाकोर, हुमैरा काझी, युवा आणि गुणवान क्रिकेटपटू इरा जाधव, सानिका चाळके आणि सिमरन शेख यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश असेल. पुरुष लीगमध्ये आठ संघ आहेत, तर महिला लीगच्या पहिल्याच हंगामात तीन संघ सहभागी होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे