
लातूर, 11 जून (हिं.स.)।
शिरूर अनंतपाळ शहरातील ऐतिहासिक श्री अनंतपाळ मंदिर परिसरातील कल्लोळ धोकादायक अवस्थेत असून अर्धवट राहिलेल्या कामामुळे शेजारील घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढल्याने नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मंदिर परिसरातील कल्लोळाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम काही काळापूर्वी सुरू करण्यात आले होते मात्र हे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने कल्लोळ शेजारील घरांच्या भिंतीची स्थिती दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे. काही ठिकाणी माती खचण्यास सुरुवात झाली असून जोरदार पावसामुळे घरांच्या भिंती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कल्लोळालगत अनेक नागरिकांची घरे असून तेथील महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना सतत धास्ती वाटत आहे. रात्रीच्या वेळीही नागरिकांना भीतीच्या वातावरणात
राहावे लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने पाहणी करावी व रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कल्लोळाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनास इशारा देताना सांगितले की, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या भागातील शिवदास उंबरगे, विठ्ठल गुंठे, मनोहर सामनगावे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis