

चर्मकार समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
रायगड, 12 जून (हिं.स.) : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील पादत्राणे दुरुस्ती व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवसाय करता यावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या गटई स्टॉल योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 10 पात्र लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सुनील जाधव तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
वरसोली येथील मुलांचे शासकीय वसतिगृह येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जवाळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना स्टॉलचे वाटप करण्यात आले. ही योजना 100 टक्के अनुदानावर आधारित असून प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात व्यवसाय प्रोत्साहन म्हणून 5 हजार रुपयांची आर्थिक मदतही जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे यांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करत व्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी विविध प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कौशल्य विकास विभाग, केंद्र शासनाची विश्वकर्मा कर्ज योजना तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
या योजनेमुळे रस्त्याच्या कडेला उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या चर्मकार समाजातील व्यावसायिकांना सुरक्षित आणि सुसज्ज कार्यस्थळ उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक स्थैर्याला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)