
रायगड, 12 जून (हिं.स.) : विकसित भारत-2047 या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अकराव्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप सादर केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे 14 टक्के योगदान देणारे महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. राज्याने 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, 2035 पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची सर्वसमावेशक अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई येथे जागतिक दर्जाची ‘एज्युसिटी’ विकसित करण्याचे कामही सुरू आहे.कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देताना राज्यात 3.30 लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थी नोंदणीकृत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील पाच वर्षांत 1.25 लाख उद्योजक घडविणे आणि 50 हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच युवकांना आंतरराष्ट्रीय रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार पॅकेजेसची संख्या 2,399 पर्यंत वाढविण्यात आली असून 4,537 रुग्णालये या योजनांशी जोडण्यात आली आहेत. राज्यात 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे.महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानांतर्गत 50 लाख ‘लखपती दिदी’ निर्माण झाल्या असून ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सध्या 1.66 कोटी महिलांना मिळत आहे.
याशिवाय आकांक्षित जिल्हे व तालुक्यांच्या विकासावर विशेष भर, गडचिरोलीसाठी स्वतंत्र विकास आराखडा, पर्यटन क्षेत्राचा विस्तार, एआय धोरणाद्वारे गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती तसेच उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)