
रायगड, 12 जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता वाढविणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष Pratap Sarnaik यांनी दिली.
या निर्णयानंतर राज्यभर स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 25 लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डे लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभर 4,000 हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे कार्यरत आहेत.
स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने मिळाव्यात तसेच एसटी प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्यात येत आहे. नागरिकांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड मिळवून ते सक्रिय करून घ्यावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)