ठाणे : विनय आपटेंच्या 75 व्या जयंतीनिमित्त विशेष नाट्यप्रयोग
ठाणे, 12 जून (हिं.स.) : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे बुधवारी 17 जून रोजी रात्री 8 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे दोन प्रथम क्रमांक प्राप्त एकांकिकांचे विशेष प्रयोग सादर करण्यात येणार
विनय आपटे प्रतिष्ठानचा लोगो


ठाणे, 12 जून (हिं.स.) : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे बुधवारी 17 जून रोजी रात्री 8 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे दोन प्रथम क्रमांक प्राप्त एकांकिकांचे विशेष प्रयोग सादर करण्यात येणार असल्याचे विनाय आपटे प्रतिष्ठानने कळवले आहे.

या कार्यक्रमात “जब वी मेटा” आणि “मढं निघालं अनुदानाला” या दोन लोकप्रिय आणि पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा समावेश आहे. प्रेक्षकांना समकालीन सामाजिक, तांत्रिक आणि ग्रामीण वास्तवावर आधारित प्रभावी नाट्यअनुभव मिळणार आहे.

“जब वी मेटा” — तंत्रज्ञानाच्या आभासी जगावर मार्मिक भाष्य

म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची “जब वी मेटा” ही सध्या गाजत असलेली लोकप्रिय मराठी एकांकिका आहे. सर्वेश देसाई लिखित आणि पराग ओझा दिग्दर्शित ही एकांकिका मेटाव्हर्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) तंत्रज्ञानाच्या आभासी जगावर आधारित आहे.

या एकांकिकेत विनोदी आणि उपरोधिक शैलीत तंत्रज्ञानाचा मानवी नातेसंबंधांवर होणारा परिणाम अधोरेखित केला आहे. भविष्यातील अति-आधुनिक डिजिटल जगात तरुण पिढी कशी आभासी वास्तवात अडकते आणि वास्तव जीवनापासून दूर जाते, याचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे भावनिक नात्यांमध्ये निर्माण होणारी पोकळीही या नाटकातून ठळकपणे मांडली जाते.

“मढं निघालं अनुदानाला” — शेतकऱ्यांच्या वेदनेचा आरसा

कलांश थिएटर्स, मुंबई प्रस्तुत “मढं निघालं अनुदानाला” ही प्रायोगिक एकांकिका शेतकऱ्यांच्या वास्तव जीवनावर आधारित आहे. “माणसं हवेवर जगतात आणि शेतकरी आशेवर” या प्रभावी संकल्पनेवर आधारित ही कलाकृती शेतकऱ्यांच्या संघर्षमय आयुष्यावर प्रकाश टाकते.

प्रतीक चौधरी लिखित आणि महेश कापरेकर तसेच सागर चव्हाण दिग्दर्शित या एकांकिकेने अद्वैत 2025 राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून रायसोनी करंडक 2026 मध्येही याला मोठी प्रशंसा मिळाली आहे. सरकारी अनुदानासाठी शेतकऱ्यांची होणारी परवड, त्यांचे दैनंदिन संघर्ष आणि भावनिक वेदना यांचे वास्तवदर्शी चित्रण या नाटकात प्रभावीपणे सादर केले जाते.

सांस्कृतिक संध्या ठरणार आकर्षण

विनय आपटे प्रतिष्ठानच्या या विशेष कार्यक्रमामुळे नाट्यरसिकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या दोन वेगळ्या विषयांवरील एकांकिकांचा अनुभव मिळणार असून ठाण्यातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होणार आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande