
लातूर, 12 जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निरीक्षक मिलींद बोरकर यांनी दिली.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार उपस्थित होते.
निरीक्षक बोरकर यांनी सांगितले की, प्रत्येक तहसीलदार कार्यालयात मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचे काम सुरळीत पार पडावे तसेच मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक आणि साठवणूक कडक सुरक्षा व्यवस्थेत केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले.
दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांच्या सोयीसाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे सांगितले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरळीत पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, निरीक्षक बोरकर यांनी लातूर आणि औसा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मतपेटी सुरक्षा कक्षालाही भेट देऊन तयारीची तपासणी केली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis