गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सकडून ‘प्राईड इन मॅन्युफॅक्चरिंग’चे अनावरण
मुंबई, 12 जून (हिं.स.)। भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात LGBTQIA+ समावेशकतेविषयीच्या चर्चांना वेग आला असला तरी देशातील सर्वात मोठ्या रोजगारनिर्मिती क्षेत्रांपैकी एक असलेल्या उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कार्यस्थळे या चर्चेपासून मोठ्या प
मुंबई


मुंबई, 12 जून (हिं.स.)। भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात LGBTQIA+ समावेशकतेविषयीच्या चर्चांना वेग आला असला तरी देशातील सर्वात मोठ्या रोजगारनिर्मिती क्षेत्रांपैकी एक असलेल्या उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कार्यस्थळे या चर्चेपासून मोठ्या प्रमाणात दूर राहिली आहेत. ही दरी भरून काढण्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने ‘प्राईड इन मॅन्युफॅक्चरिंग’ या अनोख्या आणि व्यावहारिक टूलकिटचे अनावरण केले आहे. LGBTQIA+ प्रतिभावंतांसाठी अधिक सुरक्षित, समान, न्याय्य आणि सर्वसमावेशक उत्पादन कार्यस्थळे उभारण्यासाठी संस्थांना मदत करणे हा या टूलकिटचा उद्देश आहे.

या टूलकिटचे एकाच वेळी दोन ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. मुंबईतील कंपनीचे मुख्यालय गोदरेज वन येथे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीर सितापती यांनी तर तामिळनाडूमधील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे मनुष्यबळ विकास विभागाचे जागतिक प्रमुख वैभव राम यांनी त्याचे अनावरण केले. हे टूलकिट सर्वसमावेशक कार्यस्थळे निर्माण करण्याच्या आणि प्रत्येक व्यक्तीला सहभाग, योगदान आणि प्रगतीची संधी उपलब्ध करून देत भारताच्या उत्पादन क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक सक्षम करण्याच्या जीसीपीएलच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

समावेशन आणि विविधता (Inclusion & Diversity - I&D) विषयातील अग्रगण्य सल्लागार संस्था ट्रान्सफॉर्मिस आणि सोनीपतच्या अशोका विद्यापीठ येथील विद्यार्थीनी अंतरा रॉय चौधरी यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले ‘प्राईड इन मॅन्युफॅक्चरिंग’ हे टूलकिट कामाच्या ठिकाणी समावेशकतेतील एका महत्त्वपूर्ण उणिवेवर प्रकाश टाकते. भारतातील अंदाजे 45.4 दशलक्ष लोक स्वतःची ओळख LGBTQIA+ म्हणून सांगत असले तरी कार्यस्थळांवरील समावेशकता हे अजूनही एक आव्हान आहे. यापैकी 34% लोकांनी कामाच्या ठिकाणी आपल्या ओळखीबाबत खुलेपणाने बोलण्यामध्ये वैयक्तिक सुरक्षिततेबाबत चिंता वाटत असल्याचे नमूद केले आहे. कायदेशीर संदर्भ, उद्योगक्षेत्रातील माहिती, समावेशक कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष परिस्थितींवरील उदाहरणे यांचा समन्वय साधत हे टूलकिट वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक आणि टीमना सन्मान, आदर आणि आपलेपणाची भावना जोपासणारी कार्यसंस्कृती घडवण्यासाठी तसेच अधिक समावेशक आणि भविष्याभिमुख उत्पादन कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी कृतीयोग्य मार्गदर्शन पुरविते.

उत्पादन क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठ्या रोजगार क्षेत्रांपैकी एक असले तरी LGBTQIA+ समावेशकतेसंबंधीच्या चर्चा प्रामुख्याने कॉर्पोरेट वातावरणापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. उत्पादन क्षेत्रातील कार्यस्थळांच्या विशिष्ट कार्यपद्धती आणि सांस्कृतिक वास्तव लक्षात घेऊन, या टूलकिटमध्ये सर्वसमावेशक भरती, कार्यस्थळावरील पायाभूत सुविधा, कर्मचारी संवेदनशीलता, नेतृत्वाची जबाबदारी आणि विविध प्रतिभावंतांना यशस्वी होण्यासाठी व प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याबाबत कृतीयोग्य शिफारसी करण्यात आल्या आहेत.

टूलकिटच्या अनावरणप्रसंगी बोलताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सितापती म्हणाले, “आमच्यासाठी सर्वसमावेशकता हा कधीही एखादा कार्यक्रम किंवा विशिष्ट कालखंडापुरता मर्यादित उपक्रम राहिलेला नाही; ती आमची मूलभूत विचारसरणी आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मान, आदर आणि त्यांच्या मूलभूत हक्कांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, या साध्या पण ठाम विश्वासावर ती आधारित आहे. हे टूलकिट त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. LGBTQIA+ प्रतिभावंतांसाठी अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक उत्पादन कार्यस्थळे उभारण्यासाठी नेतृत्व, व्यवस्थापक आणि टीमना मदत होईल अशा व्यावहारिक मार्गदर्शक सूचना, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणची परिस्थिती, कायदेशीर संदर्भ आणि दैनंदिन कृती यांचा यात समावेश करण्यात आला आहे. सर्वसमावेशकता ही शेवटी आपल्या छोट्या पण सातत्यपूर्ण निर्णयांमधून घडत असते. आपण कामाच्या ठिकाणची रचना कशी करतो, निर्णय कसे घेतो आणि एकमेकांशी कसे वागतो यामधून ती प्रतिबिंबित होते.”

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे मनुष्यबळ विकास विभागाचे जागतिक प्रमुख वैभव राम म्हणाले, “उत्पादन क्षेत्र हे भारताच्या विकासाचे एक महत्त्वाचे प्रेरणास्त्रोत आहे आणि जीसीपीएलमध्ये आम्ही आमच्या उत्पादन कार्यपद्धती अधिक समावेशक बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. सध्या आमच्या चेंगलपट्टू प्रकल्पात LGBTIQA+ प्रतिनिधित्व 3% आहे आणि सर्वसमावेशकता अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. योग्य हेतू आणि कृती यांची जोड मिळाल्यास काय साध्य होऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. प्राईड इन मॅन्युफॅक्चरिंग टूलकिट हे या प्रवासात आम्हाला मिळालेल्या शिक्षण आणि अनुभवांचे फलित आहे. उत्पादन क्षेत्रातील समावेशकतेचा प्रवास सुरू करण्यासाठी किंवा अधिक सुलभ करण्यासाठी हे टूलकिट इतर संस्थांनाही उपयुक्त ठरेल अशी आम्हाला आशा आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande