
मुंबई, 13 जून (हिं.स.)। महाराष्ट्रातील घराघरांत हास्याचे अविरत फवारे उडवणारा आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता अधिक धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दर्जेदार विनोदशैली, अफलातून स्किट्स आणि कलाकारांच्या भन्नाट अभिनयामुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवणाऱ्या या कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सोनी मराठीने एक खास निर्णय घेतला आहे.
प्रेक्षकांच्या आग्रहाला आणि प्रेमाला मान देत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता आठवड्यातून तीन दिवस — सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाची सुरुवात १५ जूनपासून होणार असून हास्याची ही मैफल आता आणखी रंगतदार होणार आहे.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा केवळ एक विनोदी कार्यक्रम नाही, तर असंख्य प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ताणतणावाने भरलेल्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण मनमुराद हसण्यासाठी प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अनोख्या शैलीत साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि सादर केलेले विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार, कारण मनोरंजन होणार मुसळधार. प्रेक्षकांकडून सातत्याने मिळणारे प्रेम, सोशल मीडियावरील उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमाबद्दलची वाढती मागणी यामुळेच सोनी मराठीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणखी एका दिवसासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आठवड्यातील तीन दिवस प्रेक्षकांना विनोदाचा अखंड आनंद घेता येणार असून प्रत्येक भागात नवे विषय, नवी स्किट्स आणि हास्याचे नवे रंग अनुभवायला मिळणार आहेत.
मनोरंजनाचा हा मुसळधार वर्षाव, विनोदाची ही अनोखी जत्रा आणि आपल्या लाडक्या कलाकारांची धमाल पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.
महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार, कारण मनोरंजन होणार मुसळधार!
पाहायला विसरू नका — ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, १५ जूनपासून दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर!
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर