हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत पुणेकर नाराज; ‘वॉर रूम’ स्थापन करण्याची मागणी
पुणे, 13 जून (हिं.स.)। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण असतानाही प्रशासनाकडून मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत दावे केले जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या करातून उभारल्या जाणाऱ
Metro Train


पुणे, 13 जून (हिं.स.)।

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण असतानाही प्रशासनाकडून मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत दावे केले जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या करातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील विलंबासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील विविध स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी, समन्वयाचा अभाव आणि वारंवार बदलणाऱ्या मुदतींवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उद्घाटनाच्या तारखा जाहीर करण्यापेक्षा प्रकल्पातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून १०० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे आणि सातत्याने हुकणाऱ्या मुदतींमुळे पुणेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. हा प्रकल्प सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून साकारत असल्याने विलंबासाठी जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी व यंत्रणांवर थेट कारवाई करावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तसेच प्रकल्पातील अडथळे तातडीने दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘वॉर रूम’ स्थापन करून गुणवत्ता अबाधित ठेवत कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणीही पुढे आली आहे. पुणेकरांना आधुनिक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने आता ठोस कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande