
पुणे, 13 जून (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या संदर्भात काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत पक्षाच्या भूमिकेवर स्पष्टता दिली.
तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत फूट आणि प बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही राजकीय वर्तुळात तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांना कोणताही आधार नसल्याचे सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गतही विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. “राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार” अशा चर्चांचा उगम नेमका कुठून झाला याची माहितीही नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर फोडफोडीच्या राजकारणाचा आरोप करत जोरदार टीका केली. भाजपने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा प्रकार घडवला असून आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीतही तेच घडत असल्याचे त्यांनी म्हटले.
आम्ही कधीही पक्ष किंवा कुटुंबात फूट पाडण्याचे राजकारण केले नसल्याचा दावाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु