सोलापूरच्या प्रांजलची जागतिक सुवर्णभरारी; वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या ‘वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत सोलापूरच्या कु. प्रांजल रुपाली सोमनाथ व्हन्ना हिने भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदके पटकावून जागतिक स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावल
grdf


सोलापूर, 13 जून (हिं.स.)।

अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या ‘वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत सोलापूरच्या कु. प्रांजल रुपाली सोमनाथ व्हन्ना हिने भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदके पटकावून जागतिक स्तरावर देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. जगातील ७१ देशांतील खेळाडूंमध्ये झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे प्रांजलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अवघ्या १५ व्या वर्षी प्रांजलने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, खेलो इंडिया, राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये ४० हून अधिक पदके जिंकण्याचा मान मिळवला आहे. तिच्या पदकांमध्ये सुवर्णपदकांची संख्या सर्वाधिक असून ती महाराष्ट्रातील उदयोन्मुख योगासनपटूंमध्ये अग्रस्थानी मानली जाते.सध्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या प्रांजलने वयाच्या पाचव्या वर्षापासून रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये कारकीर्द सुरू केली. २०१६ ते २०२१ या कालावधीत तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली. तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून तिची निवड झाली होती.१८ ऑगस्ट २०२१ रोजी तिने योगासन क्षेत्रात प्रवेश केला. तिची क्षमता ओळखून प्रशिक्षक मंगेश खोपकर यांनी तिला स्पोर्ट्स स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली. त्यानंतर संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तिच्या योगासन प्रशिक्षणाला अधिक व्यावसायिक दिशा मिळाली.प्रांजलने ‘खेलो इंडिया युथ गेम्स’मध्ये सलग चार वर्षे पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया २०२५-२६ स्पर्धेत तिने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. याशिवाय राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड, सीबीएसई नॅशनल आणि विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सातत्याने पदकांची कमाई केली आहे. दिल्ली येथे झालेल्या आशियाई योगासन स्पर्धेतही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.अहमदाबाद येथील जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करून प्रांजलने सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षक मंगेश खोपकर, ध्रुव ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, कुटुंबीय तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande