सोलापूर खणीकर्म विभागाच्या खात्यावर सायबर हल्ला; 8.55 लाखांचा प्रयत्न हाणून पाडला
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्हा खणीकर्म कार्यालयाला सायबर गुन्हेगारांनी मोठा आर्थिक दणका देत बनावट चेकच्या माध्यमातून लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तीन लाख 92 हजार रुपये खात्यातून वर्ग करण्
सोलापूर खणीकर्म विभागाच्या खात्यावर सायबर हल्ला; 8.55 लाखांचा प्रयत्न हाणून पाडला


सोलापूर, 13 जून (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा खणीकर्म कार्यालयाला सायबर गुन्हेगारांनी मोठा आर्थिक दणका देत बनावट चेकच्या माध्यमातून लाखो रुपये लाटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तीन लाख 92 हजार रुपये खात्यातून वर्ग करण्यात आले असून आणखी आठ लाख 55 हजार रुपये काढून घेण्याचा प्रयत्न वेळेत उधळून लावण्यात आला.

जिल्हा खणीकर्म अधिकारी निलिमा जाधव या कार्यालयात असताना त्यांच्या अधिकृत ई-मेलवर निखील कुमार यांना तीन लाख 92 हजार रुपये आणि सात्विक चटर्जी यांना आठ लाख 55 हजार रुपये अदा करण्यात येत असल्याचा संदेश प्राप्त झाला. हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ वरिष्ठ लिपिक अमरनाथ भिंगे यांच्यासह स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेत धाव घेतली.

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींच्या नावे कोणतेही अधिकृत चेक जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत निखील कुमार यांच्या ॲक्सिस बँकेच्या पटणा येथील राजाबाजार शाखेतील खात्यावर तीन लाख 92 हजार रुपये वर्ग करण्यात आले होते. तसेच सात्विक चटर्जी यांच्या नावाने बनावट चेक सादर करून आठ लाख 55 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच निखील कुमार यांचे बँक खाते तातडीने गोठविण्यात आले असून त्यामधील रक्कम सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी वरिष्ठ लिपिक अमरनाथ स्वामीनाथ भिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कार्यालयाच्या खात्यावर बनावट चेकद्वारे डल्ला मारण्याच्या या प्रकारामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande