अमरावती - नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; १० जुलैपर्यंत प्रशिक्षण पूर्ण होणार
अमरावती, 13 जून, (हिं.स.) - राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा नवीन अभ्यासक्रम यंदापासून लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हातात नव्या पाठ्यपुस्तकांचा संच पोहोचत असताना हा अभ्यासक्रम प्रभावीपणे शि
अमरावती - नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक सज्ज; १० जुलैपर्यंत प्रशिक्षण पूर्ण होणार


अमरावती, 13 जून, (हिं.स.) - राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा नवीन अभ्यासक्रम यंदापासून लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या हातात नव्या पाठ्यपुस्तकांचा संच पोहोचत असताना हा अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकविण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)ने विशेष नियोजन केले आहे. सर्व स्तरांवरील प्रशिक्षण १० जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा मानस परिषदेने व्यक्त केला आहे.

जनगणनेच्या कामात शिक्षकांचा सहभाग असल्याने प्रशिक्षणाचे पूर्वनियोजित वेळापत्रक पुढे ढकलावे लागले होते. यामुळे एससीईआरटीच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी नव्याने प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले असून सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे.

इयत्ता सहावीसाठी मराठी माध्यमातील २४४ आणि उर्दू माध्यमातील २४० राज्यस्तरीय प्रशिक्षक अपेक्षित असून त्यांची माहिती १५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विशेष शिक्षक, साधन व्यक्ती, अनुभवी शिक्षक, व्याख्याते, पर्यवेक्षकीय अधिकारी तसेच अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी तज्ज्ञांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.

वेळापत्रकानुसार इयत्ता सहावीच्या शिक्षकांसाठी १७ व १८ जून रोजी पूर्वतयारी कार्यशाळा, २२ ते २५ जूनदरम्यान राज्यस्तरीय, २९ जून ते २ जुलै जिल्हास्तरीय आणि ४ ते १० जुलैदरम्यान तालुकास्तरीय प्रशिक्षण होणार आहे. इयत्ता दुसरीच्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० जून व तालुकास्तरीय प्रशिक्षण २२ जून ते २ जुलैदरम्यान होईल. तर तिसरी व चौथीच्या शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० जून आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण २४ जून ते ४ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande