
सोलापूर, 13 जून (हिं.स.)। पावसाळा तोंडावर असताना आदिला नदीतील गाळ काढणीच्या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि महापौर विनायक कोंड्याल गेल्या आठ दिवसांपासून शहरातील आदिला नदी व नाल्यांची पाहणी करून गाळ काढण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात आदिला नदीचे पात्र अजूनही गाळ, कचरा, झाडी आणि झुडपांनी तुंबलेले दिसून येत आहे.
महापालिकेच्या संबंधित विभागाकडून आदिला नदीतील गाळ काढणीचे काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ४५ लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती विभागीय अधिकारी सुनिता हिबारे यांनी दिली. मात्र, नदीपात्राची सद्यस्थिती पाहता स्वच्छतेचे केवळ १५ टक्केच काम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात नदीपात्र तुंबल्यामुळे अनेक भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. यंदाही पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा आणि झुडपे कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या स्थितीमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचनांनंतरही कामात झालेल्या कथित दिरंगाईमुळे ४५ लाख रुपयांचा खर्च नेमका कुठे झाला, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, नदीतील गाळ व कचरा तातडीने हटविण्यात आला नाही तर मुसळधार पावसात मागील वर्षीप्रमाणेच पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड