
सोलापूर, 13 जून, (हिं.स.)। सोलापूर बार असोसिएशनची यंदाची निवडणूक जुलै महिन्यात पार पडण्याची शक्यता असून, जूनअखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. सुमारे १६०० ते १८०० मतदार असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र फताटे आणि ॲड. संतोष पाटील यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी १६ जूनपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. १८ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, तर ३० जून रोजी मतदान पार पडले होते. त्या निवडणुकीत ॲड. बाबासाहेब जाधव यांनी अध्यक्षपदाची बाजी मारली होती.
सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य असलेले आणि जिल्हा न्यायालयात वकिली करणारे वकील या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. यंदा १६०० ते १८०० वकील मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. निवडणूक जवळ येत असल्याने इच्छुक उमेदवारांनी संपर्क मोहीम आणि भेटीगाठींना वेग दिला आहे.
अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले ॲड. राजेंद्र फताटे यांनी यापूर्वीही बार असोसिएशनची निवडणूक लढविली असून, यंदाही त्यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा ॲड. संतोष पाटील यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून २० जुलैपूर्वी नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड