
अमरावती, 13 जून, (हिं.स.)। मेळघाटातील तीव्र पाणीटंचाईचा फटका आता विविध शासकीय व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमांनाही बसू लागला आहे. चिखलदरा येथे महिला बचत गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पेपर प्लेट व द्रोण निर्मिती प्रशिक्षणादरम्यान पिण्याच्या व वापराच्या पाण्याची कमतरता प्रकर्षाने जाणवली. जेवणानंतर भांडी धुण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अनेक महिलांनी पत्रावळी घरी नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचा पर्याय स्वीकारला.
स्फूर्ती क्लस्टर अंतर्गत नगरपरिषद चिखलदरा आणि खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी हँडमेड पेपर व द्रोण-पत्रावळी निर्मितीचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे समन्वयक सुनील भालेराव असून, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर यांच्या माध्यमातून सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या आठ सेमी-ऑटोमॅटिक मशिनरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनरीच्या सहाय्याने कच्च्या मालापासून पत्रावळी व द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण नगरपरिषद चिखलदरा येथील पर्यटन संकुलात दिले जात आहे.
प्रशिक्षणासाठी सुमारे ५० महिलांनी नोंदणी केली असून, उद्योग उभारणीसाठी आवश्यक बीजभांडवल, कच्चा माल खरेदी आणि उत्पादन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. उद्घाटनप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाचे कार्यवाहक भावेश सहारे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. नगरपरिषद बचत गट समन्वयक राजेश आटवर्धन यांनी प्रास्ताविक करत मशिनरीचे इंस्टॉलेशन, विद्युत जोडणी व कार्यपद्धतीची माहिती दिली.
केव्हीआयसीच्या मास्टर ट्रेनर अक्षिता भावे यांनी महिलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी नरेंद्र म्हांसांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणार्थींसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून, हे प्रशिक्षण ११ ते १६ जून २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. मात्र, रोजगारनिर्मितीच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने समोर आल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. आयोजकांनी अधिकाधिक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी