
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । जगप्रसिद्ध आणि अत्यंत कठीण अशा ९० किमीच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या अभिजित पड्याळ यांनी झेंडा रोवला. सकाळी सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये ९ तास ५१ मिनिटे धावून त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे.
श्री. पड्याळ यांनी या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला असून त्यांनी फिनिश लाइन पूर्ण केल्याचे ऑनलाइन माध्यमातून समजल्यानंतर रत्नागिरीत जल्लोष करण्यात आला.
दर्बान ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यान अत्यंत खडतर अशा 'अप रन' मार्गावर ही मॅरेथॉन आज झाली. श्री. पड्याळ हे सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांच्यासोबत स्पर्धेत उतरले होते.
सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल व टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या माध्यमातून अभिजित पड्याळ यांचे अभिनंदन करण्यात आले.
रत्नागिरीत होणाऱ्या कोकण कोस्टल व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन या स्पर्धांसाठी दक्षिण आफ्रिकेत आलेल्या हजारो धावपटूंना येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून पुढच्या काही वर्षांत जगभरातील स्पर्धक येऊ लागतील, असा विश्वास सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी