मेळघाटातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक; नव्या पुलांच्या उभारणीची मागणी
अमरावती, 14 जून (हिं.स.)। मेळघाट परिसरातील शंभर वर्षांहून अधिक जुने ब्रिटिशकालीन पूल सध्या धोकादायक अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक पुलांचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या पुलांच्य
मेळघाटातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक; नव्या पुलांच्या उभारणीची मागणी जोरात


अमरावती, 14 जून (हिं.स.)। मेळघाट परिसरातील शंभर वर्षांहून अधिक जुने ब्रिटिशकालीन पूल सध्या धोकादायक अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक पुलांचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या पुलांच्या उभारणीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

धारणी-परतवाडा मार्गावरील सेमाडोहपर्यंत चार ते पाच ब्रिटिशकालीन पूल आहेत. तसेच सेमाडोह गाव आणि सेमाडोह ढाना दरम्यानचा अरुंद पूलही अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या मार्गावरून दररोज नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि विविध वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने दुर्घटनेचा धोका वाढला आहे.

मागील वर्षी याच मार्गावरील एका ब्रिटिशकालीन पुलावरून खासगी बस कोसळून झालेल्या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्या घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तज्ज्ञांच्या मते, या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे. काही पुलांची दुरुस्ती करून मर्यादित काळासाठी वापर शक्य असला तरी अनेक पुलांची अवस्था चिंताजनक आहे. त्यामुळे नवीन पुलांच्या उभारणीची प्रक्रिया गतीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.ब्रिटिशकालीन पुलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र वाढती वाहतूक लक्षात घेता नवीन पूल बांधणे काळाची गरज आहे, असे मत सेमाडोह येथील ग्रामस्थ साबुलाल सेमलकर यांनी व्यक्त केले.पावसाळ्यात वाहतुकीचा ताण वाढणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तपासणी, दुरुस्ती आणि नव्या पुलांच्या उभारणीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मेळघाटवासीयांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande