
रत्नागिरी, 14 जून (हिं.स.) । नोकरी करणाऱ्या महिलांकरिता केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत 'भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था (भाकर)' संचालित 'सखी निवास' महिला वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
निवासाची संपूर्ण इमारत 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असून चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात आहेत. महिलांसाठी अत्यंत शांत, प्रसन्न आणि स्वच्छ परिसर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था असून अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा आहे. तसेच 24 तास वीजपुरवठा आणि बॅकअपसाठी इन्व्हर्टरची उत्तम व्यवस्था आहे. जेवणासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त हॉल असून, उत्तम दर्जाची मेस सुविधा उपलब्ध आहे. दर्जेदार व्यवस्था राखण्यासाठी वसतिगृहाची प्रवेश क्षमता मर्यादित ठेवण्यात आली आहे.
रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या परिसरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हे हक्काचे आणि सुरक्षित ठिकाण ठरणार आहे. वसतिगृहाचा पत्ता असा - गणेशनगर, कुवारबाव, आरटीओजवळ, ता. जि. रत्नागिरी – 415612. प्रवेशासाठी संपर्क क्रमांक - 8379947498 व 7507795321.
रत्नागिरी जिल्हा आणि परिसरात नोकरी करणाऱ्या गरजू महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि त्वरित आपल्या प्रवेशाची निश्चिती करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी