
लातूर, 14 जून (हिं.स.)
लातूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पहाटे घडलेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चाकूरजवळील अलगरवाडी पाटी येथे झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर किनगाव-चाकूर महामार्गावरील जढाळा गावाजवळ झालेल्या कार अपघातात चालकासह १७ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी सायंकाळी कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी तसेच कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये तेलगाव येथील जनार्दन येणगे आणि साविता येणगे यांचा समावेश आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, रविवारी पहाटे किनगाव ते चाकूर महामार्गावरील जढाळा गावाजवळ आणखी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील कार दुभाजकावर आदळल्याने कारचा चक्काचूर झाला. या अपघातात चालकासह अवघ्या १७ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले.
दोन्ही अपघातांच्या घटनांमुळे चाकूर परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून दोन्ही घटनांचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis