
अमरावती, 14 जून (हिं.स.) : जिल्हा परिषदेच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा निपटारा आणि नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या व्हीसी सभागृहात सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत 19 मे रोजी झालेल्या मागील बैठकीनंतर विविध विभागांनी केलेल्या कामकाजाचा आणि साध्य केलेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, प्रलंबित कामे आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नवीन बचतगट स्थापना, पुनर्जीवित बचतगट, खेळते भांडवल, बँक कर्ज वितरण, लखपती दीदी आणि नमो ड्रोन दीदी योजनांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओडीएफ प्लस, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, एफएसएम आणि इतर निर्देशांकांबाबत सविस्तर चर्चा झाली. तर जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’, जलसेवा आकलन आणि पाणी गुणवत्तेबाबत आढावा घेण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अपूर्ण कामे, घरकुलांचे पूर्णत्व प्रमाणपत्र (सीसी), आधार ई-केवायसी, वेळेत मजुरी अदा करणे, मनुष्यदिन निर्मिती आणि रिक्त रोजगार सेवक पदांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
याशिवाय पंचायत विभागामार्फत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग, कर वसुली, ग्रामपंचायत लेखा आक्षेप, चौकशी प्रकरणे आणि जनसुविधा कामांचा आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांवर तर महिला व बालकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या पायाभूत सुविधांवर विशेष चर्चा करण्यात आली.बैठकीस सर्व विभागांचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी