
अमरावती, 14 जून (हिं.स.) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील एकूण ७६ इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये अतिधोकादायक (सी-1) प्रवर्गातील 26 तर धोकादायक पण दुरुस्तीयोग्य (सी-2ए) प्रवर्गातील 50 इमारतींचा समावेश आहे.
महापालिकेने या इमारती तातडीने रिकाम्या करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित मालक आणि भोगवटदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 264 अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी इमारतमालक आणि भाडेकरूंमधील वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे नोटिसांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, धोकादायक इमारतींमुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मालक आणि भोगवटदारांवर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच संबंधितांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून आवश्यक ती दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे.
झोननिहाय पाहणीमध्ये राजापेठ झोनमध्ये सर्वाधिक १८ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. यामध्ये तखतमल व्यापारी संकुल, सेंटर लॉज, इंद्रपुरी हॉटेल, एकवीरा देवी संस्थानची चाळ तसेच गोरक्षण संस्थेसह काही खासगी इमारतींचा समावेश आहे.
पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारतींबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित मालक आणि रहिवाशांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी